Husband Wife Death News Pudhari
अमरावती

Amravati Couple Death News: जन्मोजन्मीची सोबत! पतीच्या निधनानंतर काही तासांतच पत्नीनेही सोडले प्राण

Amravati Husband Wife Death | आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या गवई दांपत्याची अंत्ययात्रा निघाली एकत्रच

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : 'सुखात आणि दुःखात एकमेकांची साथ देऊ' असे लग्नावेळी घेतलेले वचन अमरावती जिल्ह्यातील हाथखेडा येथील एका वृद्ध दांपत्याने मृत्यूच्या दारातही पाळले. गेल्या ५० वर्षांपासून संसाराचा गाडा सोबत ओढणार्‍या पती-पत्नीने अवघ्या काही तासांच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. विश्वासराव नथ्थुजी गवई (वय ७५) आणि त्यांच्या पत्नी येनूबाई विश्वासराव गवई (वय ७०) या दांपत्यावर (दि.२५) एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या 'साता जन्माच्या' नात्याची चर्चा परिसरात होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वासराव आणि येनूबाई हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होते. कुटुंबियांकडून त्यांची योग्य काळजी घेतली जात होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. २४ मार्च रोजी प्रथम विश्वासराव गवई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पत्नी येनूबाई यांचीही प्राणज्योत मालवली. अर्ध्या शतकाचा सहवास असा एकाचवेळी संपल्याने कुटुंबासह संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला.

दोघांची अंत्ययात्रा गावातून एकत्रच काढण्यात आली आणि त्यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुख-दुःखाच्या प्रवासात आयुष्यभर एकमेकांना आधार देणार्‍या या दांपत्याची एक्झिटही सोबतच झाल्याने ग्रामस्थ भावूक झाले होते. या दु:खद प्रसंगी अनुबाई आणि विश्वासराव गवई यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गावकरी आणि नातेवाईकांनी दुःख सावरत दोघांचे अंतिम संस्कार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT