Chikhaldara Bear Attack Tribal Laborer Injured AI
अमरावती

Chikhaldara Bear Attack | चिखलदरा येथे दोन अस्वलांच्या हल्ल्यात आदिवासी मजूर गंभीर जखमी, कंत्राटदाराच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

चिखलदरा आणि लगतच्या परिसरात वन्यजीवांचा वावर सातत्याने वाढत असल्याने नागरिक, मजूर तसेच पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना

पुढारी वृत्तसेवा

Chikhaldara Bear Attack Tribal Laborer Injured

अमरावती : चिखलदरा शहरात बुधवारी वन्यजीवांच्या दहशतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सिपना महाविद्यालयाच्या परिसरात बुधवारी (दि.१६) दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन अस्वलांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एक आदिवासी मजूर गंभीर जखमी झाला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जयराम गन्नू कासदेकर (वय ४५) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयराम हे सिपना महाविद्यालयाच्या परिसरातून जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यात कासदेकर गंभीर जखमी झाले. त्यांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

त्याच वेळी रस्त्यावरून चारचाकी वाहनाने जाणारे स्थानिक कंत्राटदार इम्रान हुसेन यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी जराही वेळ न दवडता आपले वाहन थेट अस्वलांच्या दिशेने नेले. वाहनाचा मोठा आवाज आणि दिशा पाहून दोन्ही अस्वलांनी जंगलात पळ काढला. त्यानंतर हुसेन यांनी जखमी जयराम यांना स्वतःच्या वाहनातून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कंत्राटदार इम्रान हुसेन यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, चिखलदरा आणि लगतच्या परिसरात वन्यजीवांचा वावर सातत्याने वाढत असल्याने नागरिक, मजूर तसेच पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने वन विभागाच्या गस्त यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरी वस्तीजवळ वन्यप्राण्यांचा शिरकाव रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT