Amravati Crime : घरफोडीतील सोने वितळवून केला गोळा; चौघांना अटक 
अमरावती

Amravati Crime : घरफोडीतील सोने वितळवून केला गोळा; चौघांना अटक

पुण्यातून मुख्य आरोपीला ताब्यात; १.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा भिलटेक येथे वृद्ध महिला घरात एकटी असल्याची संधी साधून घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुण्यातील भोसरी एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले, तर त्याच्या तीन साथीदारांना चांदूर रेल्वे येथून अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीच्या दागिन्यांपासून तयार केलेला ८.९४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोळा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोनोरा-भिलटेक येथील आशिष संजय कावरे यांच्या घरी ४ ते ६ मार्चदरम्यान ही घरफोडी झाली होती. घरात त्यांची आजी एकटी असल्याची संधी साधून तीन अज्ञात व्यक्तींनी घराच्या मागील भिंतीवरून प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने चोरून आरोपी पसार झाले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानुसार चेतन नरेंद्र चव्हाण (वय २५) याचा शोध घेऊन त्याला भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत चेतन चव्हाण याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रतीक राजेंद्र बागडे (वय २३), शेख नदीम शेख नबी (वय २४) आणि रोहित रवी इमले (वय २५) यांनाही चांदूर रेल्वे येथून ताब्यात घेतले. चोरी केलेले सोने रोहित इमले याने एका सोनाराकडे विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावती नसल्याने सोनाराने सोने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर चोरीच्या दागिन्यांपासून सोन्याचा गोळा तयार करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी ८.९४० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख २८ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोळा आणि सुमारे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली.

ही कारवाई अमरावतीचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पीएसआय रोहित कुदळे, एएसआय मनोज चचेरे, पोलिस अंमलदार गजेंद्र ठाकरे, सुधीर बावणे, सचिन गायधने, दिनेश कनोजिया, चेतन दुबे, सायबर विभागाचे विकास अंजिकर व रितेश गोस्वामी तसेच चालक प्रज्वल राऊत यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT