अमरावती :शेतजमिनीच्या वादाने रक्ताच्या नात्यात इतका कडवटपणा निर्माण केला की, एका मोठ्या भावाने आपल्याच सख्ख्या धाकट्या भावाचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना शुक्रवारी (दि.१) रात्री ११ वाजताच्या सुमारास अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत छाया नगरात घडली.
या हल्ल्यात मध्यस्थी करणारा तिसरा भाऊदेखील गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहम्मद मकसूद मोहम्मद लुकमान (५७, रा. नूर नगर) आणि आरोपी अब्दूल तसकीन मोहम्मद लुकमान (६०, रा. छायानगर) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री याच कारणावरून तिन्ही भावांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक उडाली.
वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.रागाच्या भरात ६० वर्षीय अब्दूल तसकीनने धारदार चाकूने धाकटा भाऊ मकसूद याच्या छातीवर वार केला. हा वार इतका भीषण होता की मकसूद रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
तिसरा भाऊही जखमी
हा रक्तरंजित संघर्ष थांबवण्यासाठी तिसरा भाऊ मोहम्मद नाजीम मोहम्मद लुकमान (५४, रा. पूर्णानगर) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. नाजीम यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी मुख्य आरोपी अब्दूल तसकीन याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या गुन्ह्यात त्याला साथ देणारे अन्य दोन साथीदार नाहिद काझी उर्फ रेहमान डेंटर आणि सलेकिन अब्दूल सलीम काझा हे सध्या पसार आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.