Bhatkuli Murder Case
अमरावती : भातकुली पोलीस ठाणे हद्दीत २५ फेब्रुवारीरोजी रात्री नोंदविण्यात आलेल्या अपघाताच्या प्रकरणाचा तपास करताना तो प्रत्यक्षात खून असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपीवर अटकेची कारवाई करण्याची तयारी सुरू असून तो सध्या रुग्णालयात पोलिस निगराणीखाली उपचार घेत आहे. जितेराजा अरुण गौड (वय १२) असे अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरायठा, शाहागड बंडा, जि. सागर (मध्यप्रदेश) येथून साडी विक्रीसाठी आलेले काही कुटुंबीय सहा-सात दिवसांपूर्वी भातकुली परिसरात वास्तव्यास होते. त्यापैकी जितेराजा अरुण गौड व त्याचा नातेवाईक बब्बु बिसनांथ गौड हे २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भातकुली ते चेचरवाडी रोडवरील पुलाजवळ पाणी आणण्यासाठी जात असताना मोटारसायकलने मागून धडक देऊन पसार झाल्याची तक्रार देण्यात आली होती. जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, भातकुली येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी जितेराजा अरुण गौड (वय १२) यास मृत घोषित केले, तर बब्बु बिसनांथ गौड (वय १८) यास पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून भातकुली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन जखमांची पाहणी केली असता त्या धारदार शस्त्राने झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आला. त्यानंतर मृतकाचे वडील व नातेवाईकांना गुन्हे शाखा कार्यालयात बोलावून विश्वासात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत जेवणाच्या कारणावरून जितेराजा व बब्बु यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली आणि रागाच्या भरात बब्बु बिसनांथ गौड याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान आरोपी सुद्धा जखमी असून त्याच्यावर पोलिस निगरणीत उपचार सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, (गुन्हे) रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे व कैलास पुंडकर (गाडगेनगर विभाग) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, महेश इंगोले, अमोल कडू, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने तसेच पोलीस अंमलदार सुनील लासुरकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, जहीर शेख, सचिन बहाळे, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, विकास गुडधे, अतुल संभे, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सैयद, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, रंजीत गावंडे, राजीक रायलीवाले, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार तसेच चालक संदीप खंडारे, प्रभात पोकळे, चेतन शर्मा व राहुल दुधे यांनी ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणी आरोपीवर लवकरच औपचारिक अटकेची कारवाई करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.