अमरावती : गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही गर्भ असल्याचा दुर्मिळ प्रकार बुलडाण्यात उघडकीस आला होता. संबंधित महिलेची सुखरूप प्रसूती झाली. मात्र त्या बाळाच्या पोटातील अर्भक काढण्यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांच्या बाळावर ४ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्याच्या पोटातून दीड तासात अर्भकसदृश मांसाचे दोन गोळे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. तब्बल १७ दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी (दि.21) त्या बाळाला घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली. यावेळी बाळाच्या आईला अश्रू अनावर झाले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील एका महिलेने एका बाळाला जन्म दिला. या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे प्रसूतीपूर्वी केलेल्या सोनोग्राफीत दिसून आले होते. बाळाची शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून ते गोळे बाहेर काढले. वैद्यकीय भाषेत या प्रकाराला फिट्स इन फिटू म्हणतात. अर्भकसदृश हाडामांसाचा गोळा एखाद्या बाळाच्या पोटात वाढणे, असा हा प्रकार असतो. जगात आतापर्यंत अशा ३३ घटनांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये फक्त एकच गोळा दिसून आला होता. मात्र या प्रकरणात पहिल्यांदा एकाच बाळाच्या पोटातून दोन गोळे बाहेर काढण्यात आले. ही जगातील बहुधा पहिलीच घटना असावी, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी सांगितले.
सुपर स्पेशालिटी येथील तज्ञ डॉक्टरांसह चमूने या बाळाकडे विशेष लक्ष दिले. तब्बल १७ दिवसांच्या उपचारानंतर बाळ सुदृढ झाल्याने त्या बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील पेडियाट्रिक सर्जन, बालरोग तज्ज्ञ व सर्व टीमचा आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्ता श्वेता सिंघल, संजय खोडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या बाळाचे आई-वडील यांनाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, डॉ. नवीन चौधरी, डॉ.उषा गजभिये, डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ . नितीन बरडिया, डॉ.नम्रता भस्मे, डॉ. निलेश पाचबुद्धे, आरएमओ डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. शाम गावंडे आदी उपस्थित होते.