अमरावती: लग्नसमारंभासाठी जात असलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. वरूड-मोर्शी महामार्गावरील खडकी फाट्याजवळ मंगळवारी (दि.२८) सकाळी झालेल्या एका भीषण कार अपघातात नागपूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर कार चालक गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील कामठी खैरी भागातील विनायक कॉलनीतील रहिवासी असलेले नांदे कुटुंब एका लग्नकार्यासाठी कार क्रमांक MH 40 KR 0721 ने जात होते. त्यांची कार वरूड-मोर्शी महामार्गावरील खडकी फाट्याजवळ आली असता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात समाधान किसनराव नान्हे (वय ६२ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या किरण गोपाळ नान्हे (वय २८ वर्ष) आणि चिमुरड्या दिया गोपाळ नान्हे (वय ३ वर्ष) या दोघींनी वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण सोडले. कार चालक गोपाळ समाधान नान्हे (वय ३४ वर्ष) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताचा आवाज ऐकताच खडका येथील सरपंच राहुल फुले आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेनोडा येथून रुग्णवाहिका बोलावून जखमींना कारबाहेर काढण्यात आले. बेनोडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.