अमरावती : जिल्ह्यात वरुड-आष्टी मार्गावरील राजुरा बाजार परिसरात बुधवारी (दि.१८) दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणार्या 'शिवाई' एसटी बसने समोरून येणार्या प्रवासी ऑटोरिक्षाला चिरडले. काळजाचा थरकाप उडवणार्या अपघातात शाळेत जाणार्या सातवीतील चिमुकलीसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन प्रवासी मृत्यूशी झुंज देत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच ४९/बीझेड ९४३६ क्रमांकाची 'शिवाई' बस वरुडहून तळेगावमार्गे वर्ध्याकडे जात होती. त्याच वेळी वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील काही विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक ऑटोरिक्षाने वरुड शहराच्या दिशेने येत होते. राजुरा बाजार नजीक बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा पत्रा कापला जाऊन आतील काही प्रवासी बाहेर फेकले गेले तर काही जण आतमध्ये अडकले होते. मोठा आवाज ऐकून शेतातील मजूर आणि परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
अपघातातील मृतांमध्ये माही प्रवीण मांगूळकर (वय १३, रा. वाडेगाव), ऑटोचालक कैलास घनश्याम नागदेवे (वय ४२, रा. वाडेगाव), हरिभाऊ दौलत शिंदे (वय ८३, रा. वघाळ) आणि चिंतामन सदाशिवराव नागदेवे (वय ६०, वाडेगाव), राजकुमार भलावी (वय ५५, रा. गव्हाणकूंड) यांचा समावेश आहे. तर प्रतिभा लाड, (रा. वडाळा), मोहिनी वनदेव भोरे (वय १८, रा. राजुरा बाजार) गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून, बसचालकाला अटक करण्यात आली आहे. रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का आणि अपघाताचे नेमके तांत्रिक कारण काय, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
सकाळी आनंदाने शाळेत आणि कामावर निघालेल्या निष्पाप जीवांवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तीव्र दुःख व्यक्त होत आहे.
अपघाताची बातमी वार्यासारखी पसरताच वरूड ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या हक्काच्या माणसांना गमावल्याने नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ही 'शिवाई' बस भाडेतत्त्वावर चालवली जात असून, चालकाच्या अतिवेगामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.