अमरावती : स्कूल बसमधून उतरून घरी जात असताना त्याच बसच्या धडकेने एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा घटनास्थळीच अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील बाजार चौकात शनिवारी (दि.८) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ईश्वरी रवींद्र ठाकरे (वय ७) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरी ही चांदूर बाजार येथील आनंद प्रायमरी स्कूलमध्ये केजी-१ मध्ये शिकत होती. शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे स्कूल बसने (क्रमांक एमएच २७ ए ९७६३) रिद्धपूर येथील बाजार चौकात उतरली. घरी जाण्यासाठी ती बसच्या समोरून जात असताना, चालक अक्षय रामदास कुरसुंगे (वय २२, रा. विष्णोरा पोरगव्हाण) याने निष्काळजीपणे व घाईगडबडीत बस पुढे नेली. त्यामुळे ईश्वरीचा तोल जाऊन ती बसच्या समोरच्या चाकाखाली आली.
हा भीषण अपघात तिच्या आजोबांच्या डोळ्यांदेखत घडला. मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. नागरिकांनी तात्काळ चालकाला बस थांबवायला लावून चिमुकलीला त्याच स्कूल बसमधून चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
गावात तणाव आणि पोलीस बंदोबस्त:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चिमुकलीच्या मृत्यूनंतर रिद्धपूरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला.
चालकावर गुन्हा दाखल:
नागरिकांचा आक्रोश पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निष्काळजीपणे बस चालवणार्या अक्षय कुरसुंगे याला ताब्यात घेतले आहे. अमरावती पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड व चांदूर बाजार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.