अमरावती : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डी-रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (दि. ५) दुपारी झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना हा भीषण अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, आयआरबी (IRB) कंपनीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. यावेळी साहित्याने भरलेला आयआरबी कंपनीचा ट्रक (एमएच २७ बीएक्स ७१९२) रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, भरधाव वेगाने आलेला एक ट्रक (एनएल ०१ क्यू ४३२०) अचानक अनियंत्रित होऊन उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळला. या धडकेनंतर ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांनाही फरफटत नेले.
या भीषण अपघातात ट्रकचालक शिवचंद श्रीराम पाल (वय ३८, रा. भदोही, उत्तर प्रदेश) याच्यासह मुकुंदराव श्रीरामजी गणोरकर (वय ५५) आणि देविदास पाटील (वय ५३, दोघेही रा. चित्तूर, ता. आष्टी, जि. वर्धा) यांचा जागीच मृत्यू झाला. भूषण पांडुरंग गणोरकर, दिलीप भरापे (रा. मोझरी) आणि अशोक उके हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
ट्रकचालक शिवचंद श्रीराम पाल यांचा कॅबिनमध्येच मृत्यू झाला होता. अपघातामुळे चालकाचा मृतदेह काही वेळ ट्रकमध्येच अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर कॅबिनमधून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.