अमरावती : उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या अमरावतीतील एका तरुणाच्या प्रवासाचा शनिवारी (दि.९) अत्यंत भीषण शेवट झाला आहे. अमरावती-खंडवा राष्ट्रीय महामार्गावरील गुंडी जवळ 'नेक्स्ट लेव्हल' मॉल मधील स्पा संचालक गौतम राजेश सेवानी (वय २३) यांच्या कारला भीषण अपघात झाला.
धावत्या कारमध्ये मौजमस्ती सुरू असताना अचानक स्टिअरिंगला धक्का लागल्याने कारचे नियंत्रण सुटले आणि ती तब्बल तीनदा उलटली. या भीषण अपघातात गौतम यांचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील चालक आणि दिल्ली येथील दोन तरुणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेवरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
अधिक माहितीनुसार, उज्जैन दर्शनासाठी जाणार्या स्पा संचालकाची कार खंडवा अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गुंडी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समोर स्टिअरिंगला धक्का लागल्याने पलटी झाली. यामध्ये संचालक गौतम राजेश सेवानी (वय २३) यांचा जागीच मृत्यू झाली तर वाहन चालक दर्शन योगेश (वय २३, महेंद्र कॉलनी) आणि स्पा मध्ये काम करणा-या दोन तरुणी तनु (वय २६) आणि नायरा (वय २४, रा.दोन्ही दिल्ली ) किरकोळ जखमी आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या चर्चा या घटनेमुळे शहरात रंगलेल्या आहे.
माहितीनुसार नेक्स्ट लेवल मॉलमध्ये स्पा सेंटर चालविणारे गौतम राजेश सेवानी शुक्रवारी रात्री स्पा सेंटर मधील मुली तनु नायरा आणि ड्रायव्हर दर्शन योगेश सोबत उज्जैन महाकालचे दर्शन घेण्यासाठी कार एमएच ०४ जेके ०३९८ ने जात होते. कारमध्ये सर्वजन मौजमस्ती करत असताना अचानक स्टेरिंगला धक्का लागला आणि कार अमरावती खंडवा राष्ट्रीय महामार्गावर गुंडी येथील बाजार समिती समोर अचानक पलटी झाली. कार तीन वेळा पलटली. यामुळे गौतम सेवांनी रस्त्यावर दूर फेकले गेले. अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर सह दोन्ही मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत.
घटनेनंतर तिथे उपस्थित नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी गौतम सेवानी यांना मृत घोषित केले. हा अपघात झाला ते ठिकाण ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती अमरावती शहरात पसरताच शोककळा पसरली. यामुळे वेगवेगळ्या चर्चा देखील शहरात रंगलेल्या आहे.