अमरावती

अमरावती : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सैनिकाचा मृत्यू, एक गंभीर

backup backup
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : सुट्टीवर घरी आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाटगाव येथे घडली. या अपघातात त्याचा एक मित्र देखील गंभीर जखमी आहे. अविनाश अंबादास उईके (२४, रा. गणेशपुर, मोर्शी) असे मृतक सैनिकाचे तर विशाल सुखीराम तुमडाम (१९, रा. तेंबुरखेडा, वरुड) असे जखमी युवकाचे नाव आहे.
अविनाश उईके हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. सध्या तो ओडिसा या ठिकाणी देश सेवेवर होता.तो नुकताच सुट्टीवर आपल्या गावी गणेशपुर येथे आला होता. बुधवारी सकाळी अमरावती येथे शिक्षण घेत असलेल्या भावाच्या भेटीसाठी अविनाश आणि त्याचा मित्र विशाल हे दोघेही दुचाकी क्रमांक एम एच 27 डीजी 39 44 ने मोर्शीवरून अमरावतीकडे येत होते. दरम्यान रहाटगाव टी पॉईंट येथे भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात अविनाश उईके हा जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला विशाल तुमडाम हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होताना दिसते. एका मागून एक येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता येथे कायम आहे. येथून काही अंतरावरच बायपास असल्यामुळे वाहनांची गती नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.
SCROLL FOR NEXT