अमरावती : मेळघाटातील धारणी-बैरागड मार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्या आधीच एका गरोदर महिलेला प्रसवेदना सुरू झाल्या आणि रस्त्यावरच तिने बाळाला जन्म दिला. ही घटना आज शनिवारी १३ सप्टेंबरला उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहे. मेळघाटातील दयनीय अवस्थेचे आणखी एक उदाहरण यामुळे पुन्हा समोर आले.
माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कोट्यातरमल गावातील बिंदा अरुण साठे (वय २८) ही महिला शुक्रवारी पती अरुण साठे सोबत सोनोग्राफीसाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात आली होती. सोनोग्राफी करताना त्यांना रात्र झाली. रात्री उशिर झाल्यामुळे त्यांनी उकूपाठी गावात नातेवाईकांकडे मुक्काम केला. शनिवारी पहाटे पाच वाजता बिंदा साठेला प्रसववेदना सुरू झाल्या. पती अरुण हे बिंदाला मोटरसायकलवर घेऊन धारणी उपजिल्हा रुग्णालयाकडे निघाले. मात्र शहरापासून अवध्या दोन किलोमीटर अंतरावरच त्यांची रस्त्यात प्रसूती झाली. तेथून जाणार्या नागरिकांनी याची माहिती रुग्णालयातील डॉ. दयाराम जावरकर यांना दिली.
त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची अॅम्बुलन्स व १०८ ची सेवा घटनास्थळी पाठवली. १०८ रूग्णवाहिकेत सेवेवरील डॉक्टर कविता मेंदूरकर घटनास्थळी दाखल झाल्या, पण तोपर्यंत बिंदाची प्रसूती झाली होती. त्यांनी नाळ कापून माता व बालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान दोघांची प्रकृती स्थिर असून बाळाचे वजन २ किलो ४०० ग्रॅम आहे. स्थानिक नागरिकांनी धारणी वैरागड रस्त्यावरील खोल खड्ड्यामुळे प्रवास धोकादायक असल्याचे सांगितले आहे. गरोदर महिला व पादचारी नागरिकां साठी हा रस्ता जीवघेणा ठरू शकतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. कोट्यावधी रुपये खर्चूनही रस्त्याची दुरुस्ती होत नाही. फक्त कागदोपत्रीच काम प्रशासन दाखवते का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.