अमरावती : दर्यापूर-मुर्तीजापूर मार्गावर भरधाव कारने दुचाकीस जबर धडक दिल्याने भीषण अपघात होऊन दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना रविवारी (दि.२) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास घडली.
घर बांधकाम मजूर गौतम अण्णा मोहोड (वय ३७) आणि दुचाकी चालक कैलास एकनाथ पेठकर (वय ४२) दोघेही रा.जांभा खुर्द ता.मुर्तीजापूर अशी मृतकांची नावे आहेत. घटनेच्या वेळी मृतक गौतम व कैलास हे दोघेही दर्यापूर येथून काम आटोपून दुचाकी क्रमांक एम.एच २८ एफ ५३०१ने गावी जात होते.
दरम्यान दर्यापूर-मुर्तीजापूर रोडवरील स्वाद हॉटेलजवळ समोरून येणार्या भरधाव कार क्रमांक एम. एच. ४० डी.ई १२०९ ने दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक गौतम मोहोड व सहकारी कैलास पेठकर यांना डोक्याला व इतर ठिकाणी जबर मार बसला होता. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर येथे ठेवले आहे. अपघातात दुचाकीचे तुकडे झाले असून कारचा समोरील भाग चकनाचूर झाला आहे. दर्यापूर पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. घटनेनंतर कारचालक व कारमधील इतर फरार झाले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.