अमरावती : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत, परतवाडा पोलिसांनी मोघलाई भागात गांजा विक्री करणाऱ्या एका तस्करावर यशस्वी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ६५२ ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त करून आरोपीला रंगेहात पकडले.
परतवाडा पोलिसांना मोघलाई परिसरात अवैध गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद शाहीद मोहम्मद शाकीर (रा. मरीमाता मंदिरासमोर, मोघलाई) या आरोपीला गांजाची विक्री करताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा जप्त करण्यात आला.
आरोपी मोहम्मद शाहीद मोहम्मद शाकीर याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS Act) संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास परतवाडा पोलीस करत आहेत. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार, तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केले की, अमरावती ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर, विशेषतः अमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. समाजाला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांचे हे अभियान यापुढेही तीव्र गतीने सुरू राहणार आहे.