अमरावती : परतवाडा ते अंजनगाव सुर्जी मार्गावरील शहापूर फाट्याजवळ आज शनिवारी (दि.२५) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोट आगारातील एस.टी. बस आणि विरुद्ध दिशेने येणारे क्रुझर वाहन समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, परतवाडा बस आगारातून निघालेली एस.टी. बस अकोटकडे जात होती. दरम्यान शहापूर फाट्याजवळील टर्निंग पॉईंटवर बससमोरून एक ट्रक येत होता. ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरून येणार्या क्रुझरला जबर धडक दिली. धडकेमुळे क्रुझर रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी काठावर जाऊन आदळली. त्यामुळे क्रुझर चालकासह एक प्रवासी जागीच ठार झाला. मृतांमध्ये दस्तगीर बाबुराव मुलानी (वय ५५, रा. सांगली) यांचा समावेश आहे, तर दुसर्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. दोन्ही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
जखमींमध्ये महेश माहुलकर (वय ४२, अमरावती), सुखदेव सरगर (वय ५०, सांगली), मुकेश देशपांडे (वय ६०, ओमवाडी), पोपट जगताप (वय ४८, ओमवाडी) आदींचा समावेश असून, सर्वांना अमरावती इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी परतवाडा बस आगाराचे प्रमुख जीवन वानखडे तसेच पोलिस अधिकारी दाखल झाले. नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला आणि कोणाचा दोष आहे, याबाबत विरोधाभासी चर्चा सुरू आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकला वाचविताना बसने नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडला, तर काहींच्या मते बस परतवाडा कडे जात होती आणि क्रुझर शेगावच्या दिशेने येत होती. पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू असून, सत्यस्थिती चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.