अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या काँग्रेस नगर मार्गावर एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे सोमवारी (दि.१०) सायंकाळी एकच खळबळ उडाली. अमित आठवले (वय २९, रा. गगलाणी नगर ) अशी मृताची ओळख रात्री उशिरा झाली आहे. परिसरात देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.
अधिक माहितीनुसार, काँग्रेस नगर मार्गावर कार क्रमांक एमएच २७/ बीवाय/५९८४ उभी होती. बराच वेळपासून कार तेथेच असल्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांनी कार जवळ जाऊन कारचा दरवाजा ठोठावला. मात्र त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडताच आतमध्ये मृतदेहच आढळला. मृतदेह कारमधून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. हा मृतदेह अमित आठवलेचा असल्याची माहिती आहे. घटनास्थळी नागरिकांची बरीच गर्दी येथे जमली होती.
बंद कारमध्ये अमित आठवलेचा मृतदेह आढळला. ज्यावेळी पोलिसांनी कारमधून हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याच्या नाकातून रक्त वाहत होते. यावरून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी कल्पना बारवकर, सागर पाटील व फ्रेजरपुराचे ठाणेदार आपल्या पथकासह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण करून आवश्यक दिशा निर्देश दिले.