अमरावती, :अमरावती महापालिका निवडणुकीला घेऊन गुरुवारी (दि.१५) शहरात उत्साह असताना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडली. जवाहर स्टेडियम प्रभागातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर खोली क्रमांक दोन मध्ये ईव्हीएम मशीन सुरूच होत नव्हती. तब्बल वीस मिनिट येथे मतदान रखडले होते. त्यानंतर तांत्रिक समस्या दूर करण्यात आली.
यासह गाडगे नगरातील प्रगती विद्यालयातील मशीनमध्येही तांत्रिक बिघाड झाला होता. हा प्रकार सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होण्याच्या वेळेवरच झाला. त्यामुळे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना ताटकळत राहावे लागले. त्यांनी नाराजी ही व्यक्त केली. यासह अनेक प्रभागात एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या केंद्रावर असल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. काहींची नावे ही शेवटपर्यंत सापडली नाही. त्यामुळे अशा मतदारांनी मनपा प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केला. अनेक जण मतदानापासून वंचित राहिले.
महापालिकेच्या ॲपवरून दिलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याची घटना ही समोर आली. लोकशाहीचा खून: अभिजीत अडसूळ दरम्यान अमरावती महापालिकेतील अनेक प्रभागात ईव्हीएम मशीन उलट्या क्रमाने ठेवण्यात आल्या होत्या. म्हणजेच अ, ब, क,ड अशा न ठेवता ड,क,ब,अ अशाप्रमाणे ठेवण्यात आले. त्यामुळे यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी आक्षेप घेतला. ही लोकशाहीची हत्या असल्याचे देखील ते म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगावरही आरोप केले. भारतात राहून आपण उलट्याक्रमाणे ईव्हीएम कशा काय मतदानासाठी ठेवू शकतो असा सवाल ही त्यांनी केला.