अमरावती : अमरावती-नेर मार्गावर ड्रीमलँडजवळ भरधाव ऑटो रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात एका २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दीपाली दिनेश लंगडे (वय २५, रा. वडगाव माहोरे) असे मृत महिलेचे नाव आहे.
ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ऑटो अमरावतीवरून नेर-पिंगळाईकडे प्रवासी घेऊन निघाला होता. वडगाव फाट्यावरून दीपाली लंगडे आपल्या दोन लहान मुलींसह, तसेच कमल थोरात आणि दीक्षा थोरात या ऑटोमध्ये बसल्या. मात्र, बोरगाव धर्माळेजवळील ड्रीमलँडसमोर भरधाव ऑटोवरील चालकाचा ताबा सुटला आणि ऑटो रस्त्यावर पलटी झाला.
अपघात इतका भीषण होता की, दीपाली लंगडे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दोन लहान मुली, गोपाल बापूराव थोरात (वय ६०), कमल थोरात, दीक्षा थोरात यांच्यासह एकूण सहा प्रवासी जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर दीपाली यांच्या पार्थिवावर वडगाव माहोरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पसार झालेल्या ऑटोचालकाचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.