अमरावती : सरकारी कंत्राटदाराकडून ४१ हजारांची लाच मागणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेतील कार्यकारी अभियंत्याला (वर्ग–१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईनंतर गाडगेनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध (दि.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन चंद्रशेखर पाटील (वय ३५, रा. साईनगर, कल्पतरू नगर, अशोका मार्ग, नाशिक) असे लाच मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेत कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हा सरकारी कंत्राटदार असून त्याला बुलढाणा जिल्ह्यातील तीन विद्युत कामांची कंत्राटे मंजूर झाली होती. या कामांची एकूण किंमत होती सुमारे १७ लाख ९४ हजार रुपये होती. तक्रारदाराने बिल मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी बिलाच्या रकमेवर २ टक्के कमिशन म्हणजेच ३५ हजार रुपये मागितले. याच भेटीत पाटील यांनी बुलढाणा येथील जुन्या सरकारी विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे वर्क ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून आणखी ६ हजारांची मागणी केली.
या प्रकाराने संशयित तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या विभागीय कार्यालयात पडताळणी मोहिम राबवण्यात आली, यावेळी आरोपी अभियंता लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मारुती जगताप आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे, मंगेश मोहोड, अधिकारी युवराज राठोड, वैभव जायले आणि चालक गोवर्धन नाईक यांच्या पथकाने केली.