Amaravati Crime | निवडणुकीतील आर्थिक वादातून बसपा नगरसेवकाच्या घरावर सशस्त्र हल्ला; परिसरात तणाव 
अमरावती

Amaravati Crime | निवडणुकीतील आर्थिक वादातून बसपा नगरसेवकाच्या घरावर सशस्त्र हल्ला; परिसरात तणाव

पराभूत उमेदवाराच्या मुलाने आपल्या समर्थकांसह केलेल्या हल्ल्यात प्रचंड तोडफोड

पुढारी वृत्तसेवा

अमरावती: निवडणुकीतील खर्चाच्या वादातून बहुजन समाज पार्टीचे (बसपा) नगरसेवक इस्माईल कासम लालूवाले यांच्या घरावर आणि दुकानावर सोमवारी रात्री (दि.२३) सशस्त्र हल्ला करण्यात आला. पराभूत उमेदवाराच्या मुलाने आपल्या समर्थकांसह केलेल्या या हल्ल्यात प्रचंड तोडफोड करण्यात आली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून फ्रेजरपुरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्र. ११ (फ्रेजरपुरा-रुक्मिणीनगर) मधील निवडणुकीशी या वादाचे धागेदोरे जोडलेले आहेत. निवडणुकीनंतर विजयी उमेदवाराने पराभूत उमेदवाराला खर्चापोटी ठराविक रक्कम देण्याचे ठरले होते, अशी चर्चा आहे. मात्र, निकाल लागून बराच काळ उलटूनही ही रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने पराभूत उमेदवार शाहिदा बानो यांचे पती अब्दुल नफीज हे नगरसेवक लालूवाले यांच्याकडे सातत्याने तगादा लावत होते.

सोमवारी दुपारी मशिदीजवळ शाहिदा बानो यांचा मुलगा नफीस याने नगरसेवक लालूवाले यांच्या भावाला शिविगाळ केली होती. त्यावेळी नफीसच्या मामाने मध्यस्थी करून त्याला घरी पाठवले होते. हा वाद तिथेच मिटला असे वाटत असतानाच, रात्री ९ ते १० च्या दरम्यान नफीसने आपल्या १० ते १५ साथीदारांसह नगरसेवकांच्या घरावर चाल केली.

तलवार आणि दुकानाची तोडफोड

हल्लेखोरांनी केवळ दगडफेक केली नाही, तर हातात तलवारी घेऊन नगरसेवकांच्या घरालगत असलेल्या किराणा दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानात असलेल्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोरांनी दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली, ज्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ सुटली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्यासह फ्रेजरपुरा, शहर कोतवाली आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी शीघ्र कृती दलाच्या (QRT) तुकडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संशयित आरोपी नफीससह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. सध्या फ्रेजरपुरा परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अन्य फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT