अमरावती : प्रा. संतोष गोरे यांच्या मृत्यू प्रकरणी 34 लोकांवर जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यवतमाळ येथील बापूजी अणे महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.संतोष गोरे यांनी रविवारी रात्री अडीच वाजता धामणगाव येथे रेल्वेखाली येऊन जीवन संपवले होते. सोमवारी (दि.२४) सकाळी ही घटना उघडकीस आली होती. त्यांच्या जवळ एक चिठ्ठी देखील मिळाली होती. या चिठ्ठीवर त्यांनी ३४ लोकांचे नाव लिहिले होते. ही चिठ्ठी समोर आली आहे. या चिठ्ठीच्या आधारावर बडनेरा जीआरपीएफ पोलिसांनी ३४ लोकांविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कलम १०८ व ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये दहा महिलांचा देखील समावेश आहे. प्रा. गोरे यांनी जीवन संपवण्यापूर्वी आपली मालमत्ता पत्नी सम्मोहीनी उर्फ जिज्ञासा गोरे आणि मुलगी मीनाक्षी गोरेच्या नावे केली आहे.
माहितीनुसार सोमवारी सकाळी धामणगाव रेल्वे ट्रॅकवर प्रा.संतोष गोरे यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी पण होती. याबाबत पोलिसांनी गोपनीयता बागळली होती. शेवटी ही चिठ्ठी समोर आली. त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी प्रा.गोरे यांचे लॅपटॉप तपासले होते. त्यावेळी चिठ्ठीची डिजिटल कॉपी त्यांच्या हाती लागली. यानंतर प्रकरणाशी संबंधीत ३४ लोकांचे नाव समोर आले. दरम्यान सोमवारी रात्री दोन वाजता प्रा. गोरे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. माहितीनुसार प्रा. गोरे यांच्याजवळ १५ पदव्या होत्या, ते पीएचडी पण करत होते. त्यांच्या या आत्मघाती पावलामुळे शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
संतोष गोरे यांच्या सासूची प्रकृती बिघडली होती. पुणे येथील रुग्णालयात त्या भरती होत्या. यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांना पाहण्यासाठी पुणे येथे गेल्या होत्या. रविवारी संतोष गोरे एकटेच घरी होते. त्यांनी लॅपटॉप वर चिठ्ठी टाईप केली. यामध्ये दोन-तीन वेळा करेक्शन केले. प्रिंट आऊट काढली आणि आपल्या खिशात ठेवले. दरम्यान घरातील सीसीटीव्ही मध्ये, रविवारी दुपारी ३ ते रात्री ८ वाजे दरम्यान तीन ते चार लोक त्यांना भेटण्यासाठी घरी आले होते, असे दिसले आहे. या नंतर गोरे रात्री ११.३० वाजता आपल्या दुचाकीने धामणगांवला जाण्यासाठी निघाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी रेल्वे खाली येवून आपले जीवन संपवले.
सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी प्राचार्य दुर्गेश कुंटे, सरिता देशमुख, धनंजय पांडे, कविता तातेड, विवेक धर्माधिकारी ,एड.प्राजक्ता टिकले, ऋचा गडीकर, वैशाली वाटकर, चंद्रशेखर कुळमेथे, प्रवीण बोंडे ,दर्शना सायम, चंद्रकांत तोलवाणी, सतीश देशपांडे, कमलेश देशपांडे, सोमेश राठोड, मनीष वाघमारे, विनोद चव्हाण, महेश महाजन, संतोष कुमार गाजले, शैलेंद्र तेलंग, विराट घुडे,ज्ञानेश्वर गटकर, देवेंद्र भोयर, सौरभ वगारे, मनीषा गोरे, नंदा दुसाने, एड. दरणे, निलेश मोरे बंटी उर्फ निलेश तुरकर, मोनाली सलामे, दिनेश दानी, प्रदीप दुर्गे, आरती उर्फ आरु राठोड, वंशिका चिंडाले या ३४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.