विदर्भ

अमरावती : क्रेन मशीनवरून विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शेतातील विहिरीत आडवा बोर मारतेवेळी क्रेन मशीनवरील (Crane machine) लोखंडी दांड्यावर असलेला झुला तुटून विहिरीत पडलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला. अमरावती तालुक्यातील नेरपिंगळाई येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, छत्तीसगढ येथील युवक तालुक्याच्या विविध ठिकाणी पाण्यासाठी बोर मारण्याकरिता मोठ्या क्रेन मशीनसहीत (Crane machine) दाखल होतात. रिकामी जागा दिसेल, त्या ठिकाणी आपल्या मशीनसह ट्रॅक्टर उभा करून रोडच्या बाजूला संध्याकाळच्या सुमारास झोपतात. काही दिवसांपूर्वी धनसिंग नाग (वय २०), पुरनोराम नाग (वय २२) व तामिळनाडू येथील बेलमुरदन रामास्वामी (वय ४१) हे तिघे बोर मारण्याच्या टी. एन. २९- ४३७२ या क्रमांकाच्या क्रेन मशीनसह नेरपिंगळाई येथील शेतकरी संतोष महादेवराव खराटे यांच्या शेतात दाखल झाले. मंगळवारी त्यांच्या शेतातील विहिरीत आडवा बोर मारण्याचे काम सुरू होते.

यावेळी विहिरीत लोखंडी अँगलवरून सोडलेला झुला नटबोल्ट ढीले झाल्याने खाली कोसळला. त्यामध्ये विहिरीतील खडकांचा मार बसल्याने धनसिंग नाग , पुरनोराम नाग (दोघेही रा. छत्तीसगड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वेलमुरदन रामास्वामी ( रा. तामिळनाडू) हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकांना शवागारात ठेवण्यात आले असून गंभीर अवस्थेत असलेल्या वेलमुरदन याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले आहे.

याप्रकरणी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत कडुकार यांच्या मार्गदर्शनाखाली आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT