अमरावती; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या (शिंदे गट) वर्धापन दिनाला मुंबईत गेलेल्या शिवसैनिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. धीरज अंबादास राजूरकर (३१) असे त्या शिवसैनिकाचे नाव असून ते अमरावती जिल्ह्यातील शेवती येथील रहिवासी आहे. बाथरूम मधून आंघोळ करून आल्यानंतर सहकाऱ्यांशी बोलतांना अचानक भुरळ येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
१९ जून रोजी शिवसेना शिंदे गटाचा मुंबईतील नेस्टो सेंटर मध्ये वर्धापन दिन साजरा होणार असल्याने अमरावती जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहण्याकरिता गेले होते. जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांचेसह पाच ते सहा कार्यकर्ते मुंबई येथे गेले होते. यामध्ये शिवसेना तिवसा तालुका प्रमुख धीरज राजूरकर यांचाही समावेश होता. वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपून सर्व पदाधिकारी हॉटेलला परत आले. रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान सर्वांनी हॉटेल मध्ये आंघोळ केली. धीरज राजूरकर यांनी शेवटी आंघोळ केली आणि बाहेर येऊन सहकाऱ्यांशी गप्पा करत असतांना अचानक ते खाली कोसळले. सहकाऱ्यांनी तातडीने धीरज राजूरकर यांना उपचारासाठी नजीकच्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती कुटुंबियांना समजताच शेवती गावासह आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने जीटी रुग्णालयात धाव घेतली. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांनी धीरज राजूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. धीरज यांच्या कुटुंबाला तात्काळ पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून धीरज यांच्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने मी स्वीकारतो असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
२० तारखेला धीरज राजूरकर यांची उत्तरीय तपासणी करून पार्थिव कुटुंबियांना सोपविण्यात आले. बुधवारी सकाळी धीरज यांचे पार्थिव शेवती येथे पोहचल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शेवती येथील स्मशानभूमीत धीरज राजूरकर यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य, शिवसेनेच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी,कार्यकर्ते पंचक्रोशीतील मित्रपरिवार,गावकरी उपस्थित होते.
धीरज राजूरकर यांची सच्चा शिवसैनिक म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. स्वतःच्या मेहनतीने वीटभट्टी व्यवसायात मोठे नाव केले होते. आजूबाजूच्या परिसरात मधुर बोलण्याने प्रत्येकाशी अगदी जवळचे संबंध होते. एकाकी घडलेल्या या घटनेवर अनेकांचा विश्वास सुद्धा बसत नव्हता.
घटनेने राजूरकर कुटुंबावर काळाचा घाला घातला.धीरज यांच्या आकस्मिक जाण्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.अविवाहित असलेल्या धीरज यांच्या पश्चात आई, दोन बहिणी भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.