अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मोर्शी येथून भरधावपणे जाणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पाच वर्षीय बालक जागीच ठार झाला तर आईवडील दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. ही दुर्दैवी घटना डवरगाव फाट्यावर गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. अन्वित पंकज वलगावकर (वय ५, रा. अंतोरा आष्टी जि. वर्धा) असे घटनेत ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डवरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून दीड तास चक्काजाम केला. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व संतप्त नागरिकांचा जमाव शांत केला.
वर्धा जिल्ह्यातील अंतोरा आष्टी येथील पंकज वलगावकर हे आपली पत्नी कविता आणि मुलगा अन्वित यांचेसह आपल्या दुचाकीने (क्र. एम. एच. ३२, ए क्यू ६११०) अमरावती येथे काही कामानिमित्त येत होते. दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वरुड-अमरावती एसटीने (क्र.एम. एच. ०६, एस ८९५९) दुचाकीस धडक दिली. या अपघातात अन्वित एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला तर पंकज आणि कविता दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेनंतर डवरगाव येथील संतप्त नागरिकांनी क्षणातच महामार्ग बंद केला. डवरगाव येथील महामार्गावर अनेकदा अपघात झाले असून याठिकाणी गतिरोधक बसवावे या मागणीसाठी शेकडो निवेदने प्रशासनाला देण्यात आली. मात्र, प्रशासन मूग गिळून बसल्याने नागरिकांनी तब्बल दीड तास महामार्ग रोखून धरला.
माहुली जहागीर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच प्रभारी पो.नि.जयसिंग राजपूत ए.एस.आय हंबर्डे, नापोका पोटे, किरण साधनकर, गजानन धर्माळे, विनोद वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले तसेच अन्वितचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला. संतप्त आंदोलकांना विश्वासात घेऊन आपली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पत्रव्यवहार करू असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.