Akash Fundkar : राज्याची सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर Pudhari Photo
अकोला

Akash Fundkar : राज्याची सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

स्वातंत्र्यदिनी अकोल्यातील मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याच्या विकासाचा घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

अकोला : ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पना केवळ आर्थिक प्रगतीपुरत्या मर्यादित नसून, राज्याच्या समग्र आणि सर्वसमावेशक विकासाचे ते ध्येय आहे. सर्वसमावेशक विकासाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन महाराष्ट्राला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि समृद्ध राज्य बनविण्यासाठी कटिबद्ध आहे. या ध्येयपूर्तीसाठी कृषी क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने बाधित ७१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ९९ कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात २.६४ लाख शेतकऱ्यांना ८० कोटी रुपयांहून अधिकची भरपाई देण्यात आली. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेमुळे ‘अकोला कापूस’ या ब्रँडला राष्ट्रीय ओळख मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृषी विकासासोबतच जिल्ह्यात पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते व पुलांसाठी ३१५ कोटी, तर महत्त्वाच्या शासकीय इमारतींसाठी ४६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोल्यात १६.६१ कोटी रुपये खर्चून ‘कामगार भवन’ उभारले जाणार असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘वन स्टॉप ऑल केअर हब’ म्हणून विकसित करण्यासाठी ११.७८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी सर्व महसूल आणि पोलीस कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत दोन महिन्यांत २ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. यावेळी देशासाठी योगदान देणारे सैनिक, स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीय, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT