TMS 2.0 Maharashtra 
अकोला

TMS 2.0 Maharashtra | टीएमएस 2.0 : जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी अद्ययावत प्रणाली

कार्यान्वयनानंतर पहिल्या तासातच जिल्ह्यातून ६ रूग्णांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

अकोला : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी राज्यात  टीएमएस 2.0 (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर कार्यप्रणाली सुरू होताच पहिल्या तासात जिल्ह्यातून ६ रूग्णांनी नोंद केली.  या प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4 हजार 537 रुग्णालयांमध्ये 2 हजार 399 मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ सोमवारी करण्यात आला आहे.  योजनेत अकोला जिल्ह्यात 31 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण 81 रूग्णालये योजनेत समाविष्ट आहेत.                                           

सोमवारी मध्यरात्रीपासून हे पोर्टल कार्यान्वित झाले असून, रात्री पहिल्या तासातच जिल्ह्यात ६ रूग्णांची नोंद झाली. ही प्रणाली जिल्ह्यात पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी योजनेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी रात्री विविध अंगीकृत रूग्णालयांना भेटी दिल्या व कार्यान्वयन योग्य होण्यासाठी रूग्णालयांना मार्गदर्शन केले. संपूर्ण प्रक्रियेबाबत तांत्रिक पूर्ततेच्या अनुषंगाने राज्य आरोग्य हमी सोसायटीशी दूरचित्रवाणी परिषदेद्वारे संपर्क ठेवण्यात आला. त्यामुळे वेळेत सर्वत्र प्रणाली कार्यान्वित होऊन रूग्णांना योजनेचा लाभ घेण्यास मदत होत आहे, अशी माहिती योजनेच्या समन्वयक शीतल गावंडे यांनी दिली.  

`टीएमएस 2.0 प्रणाली विषयी...`

या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाईन होणार आहे.  रुग्ण नोंदणी ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.  जलद उपचार मंजुरी प्रक्रिया व उपचार स्थितीचे डिजिटल ट्रॅकिंग, डिजिटल कृत्रिम बुद्धिमत्ता मॉनिटरिंगद्वारे तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. या प्रणालीमध्ये रुग्णालय अंगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व विहित मर्यादेत पूर्ण होणार आहे. या योजनेअंतर्गत कुणाचीही फसवणूक झाल्यास 155388, 1800233200 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT