Digital Campaign Regulations
अकोला : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक 32, गुरुवार, ऑक्टोबर 9, 2025/ 17, शके 1947 यानुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, ), संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती स्थापण्यात आली आहे. समितीत पोलिस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, अपर जिल्हाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
प्रस्तावित जाहिरात प्रसारित, प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक आहे.