अकोला; पुढारी वृत्तसेवा : राज्य कुणाच्याही हातात द्या, पण काळ्या आईशी इमान राखणाऱ्या, देशाची मान उंचावणाऱ्यांना साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी केले. (कै.) वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रमानिमित्त अकोल्यात गुरुवारी (१२ ऑक्टोंबर) झालेल्या सहकार महामेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. पुढे बोलताना पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले असल्याचे सांगितले. हे प्रश्न सोडवण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. देशात आज शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न तयार झाले आहेत. कापूस आयाती सारखा निर्णय दुर्दैवाने घेतला जातो. गेल्या काही वर्षात कापसाचे उत्पादन घटले. कापूस उत्पादक सोयाबीनकडे वळाले. मात्र, आज सोयाबीनचेही सातत्याने नुकसान होत आहे. सरकारने खरेतर शेतकरी हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना तसे होत नाही. नोकऱ्या कमी झाल्या. बेरोजगारी वाढते आहे. कंत्राटी पद्धतीने नेमणुकीचे धोरण सरकार राबवत आहे. पण कंत्राटीपद्धतीने काम करणारे किती निष्ठेने संबंधित संस्था, कार्यालयात काम करतील हे सांगता येत नाही. खासगीकरणही वाढते आहे. सरकारी शाळा खासगी व्यक्ती, कंपन्यांना दत्तक देण्याची पद्धत आणली आहे. कापसाची किमत घसरली. संत्र्यालाही दर मिळत नाहीत. कांदा उत्पादकांचेही हाल होत आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांची बांधिलकी नसलेला एकही नेता निवडून यायला नको, असे ते म्हणाले.
अण्णासाहेब कोरपे यांनी संपूर्ण आयुष्य हे शेतकरी हितासाठी घातले. सहकार उभा केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक क्षेत्रातही काम केले, असे पवार म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जयंत पाटील, अनिल देशमुख, डॉ. मायी यांनी मार्गदर्शनात (कै.) अण्णासाहेब कोरपे यांचा समाजासाठी असलेल्या योगदानाचा आढावा घेतला. प्रास्ताविक डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी केले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.