अकोला : अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध बाबतीत अग्रेसर राहत राज्यात चांगला लौकिक मिळवला आहे. शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून शेतकरीभिमुख धोरणे राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी (दि.१८) केले. चोहोट्टा बाजार येथील जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री फुंडकर म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उत्तम कारभाराने बँकेने शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँक अत्यंत महत्त्वाची असते. बँकेची देदिप्यमान वाटचाल आहे. भविष्यातही व्यापक शेतकरी हितासाठी प्रयत्न व्हावेत. थकित कर्ज पुनर्गठनाची रक्कम शासनाकडून मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहात राहिला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जपुनर्गठनाची संकल्पना मांडली होती. खातेदार थकीत न राहता तो नियमित कर्ज पुरवठा प्रवाहात रहावा, हा त्यामागील मुख्य हेतु होता. बँकेने पुनर्गठीत केलेल्या कर्जाची रक्कम शासनाकडून प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी केले.
११६ वर्षापूर्वी स्थापन झालेली बँक आज जोमाने सुरू आहे. अनेक वर्षापासून थकीत असलेल्या शेतकरी सभासदांनी या बँकेच्या पीक कर्जाच्या गंगेपासून दूर जाऊ नये, म्हणून बँकेचा प्रयत्न राहील. भविष्यात शेतकरी हिताचे अनेक निर्णय शासनाच्या मदतीने घेण्यात येतील. तसेच भारत सरकारच्या सोसायटी सक्षमीकरणाच्या कामात बँकेचा मोठा सहभाग असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी प्रास्ताविकात केले. बँकेच्या संचालिका श्रीमती भारतीताई गावंडे यांनी आभार व्यक्त केले.