Matrimonial request Sharad Pawar
अकोला : लग्न झाले नाही, कोणी मुलगी देण्यास तयार नाही, वय वाढत चाललेल्या स्थितीत ग्रामीण भागातील युवकाने चक्क देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रातून पत्नी मिळवून देण्याची विनंती केली आहे. मला पत्नी मिळवून दिली, तर मी तुमचे उपकार विसरणार नाही, असे या पत्रात युवकाने नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. या पत्राची सर्वत्र खमंग चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अकोल्यात आले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर इतर ठिकाणी कार्यक्रमात भेटी दिल्या होत्या. यावेळी अकोल्यातील लग्नाळू युवकाने पवार यांना पत्र देऊन लग्न होत नाही, पत्नी मिळवून दया, अशी विनंती केली.
या पत्रात एकाकीपणा असह्य झाला आहे. माझे वय वाढत आहे. मला पत्नी मिळवून दया, कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी राहायला तयार असून तिथे चांगले काम करील, संसार नीट करील, असे या पत्रात युवकाने नमूद केल्याची माहिती आहे. अशी पत्राद्वारे शरद पवार यांच्याकडे मागणी करणाऱ्या युवकाचे नाव, गाव ही माहिती समोर आलेली नाही.
मात्र, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वृत्त वाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत असे पत्र युवकाने शरद पवार यांना दिले आहे. मुंबई येथे या पत्रावर चर्चा देखील झाली आहे. अकोल्यातील पक्ष पदाधिकारी यांना या युवकाला सहकार्य करण्याबाबत सांगितले असल्याची माहिती दिली आहे. सोबतच शरद पवार यांच्याकडून सामान्य माणसाला आशा आह . ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव या पत्राच्या आशयातून समोर येत असल्याचे देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.