अकोला : पातूर तालुक्यातील भंडारज परिसरात ११ मे रोजी अचानक ४.१५ वाजता चक्रीवादळासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे येथील रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.
वादळी पावसामुळे नागरिकांच्या घरावरील व गोठ्यावरील पत्रे उडून गेली. चक्रीवादळामुळे मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडली. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पातूर तालुक्यातील भंडारज परिसरात चक्रीवादळ व पावसासह काही वेळ गारपीट झाली त्यामुळे कांदा ,लिंबू , आंबा या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
काढून ठेवलेल्या कांद्याची देखील अवकाळी पावसामुळे नासाडी झाली. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. वादळी वारा, गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.