अकोला - जिल्ह्यातील पातूर शहरालगत एमएसईबी सबस्टेशनच्या शेजारी असलेल्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३० बकऱ्या चोरून नेल्या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे घडली.
या घटनेबाबत अधिकच्या माहिती नुसार, तक्रारदार लोडू तुळशीराम डाखोरे (५०) रा. पातूर हे तिडके यांच्या शेतात मजुरीचे काम करतात. या शेतात एकूण ४० बकऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. ५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १.३० वाजता बकऱ्यांची हालचाल सुरु झाली व माणसांची चाहूल लागल्याने त्यांनी उठून पाहिले असता, अज्ञात ३ ते ४ जण पांढऱ्या रंगाच्या मालवाहू वाहनात बकऱ्या भरताना त्यांना दिसले.
त्या वाहनामागे पांढऱ्या रंगाची कारही उभी होती. फिर्यादी यांनी त्या वाहनांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही वाहने भरधाव वेगाने पसार झाली. चोरट्यांनी अंदाजे २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या लहान-मोठ्या ३० बकऱ्या चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली. पातूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.