Akola Crime News (Pudhari File Photo)
अकोला

Akola Crime News: प्रेमविवाहाचा भयावह शेवट ! "माझ्या मृत्यूला तेच जबाबदार..." अकोल्यातील तरुणाच्या सुसाईड व्हिडिओने खळबळ

love marriage ends in tragedy Akola: पती-पत्नीत झालेल्या वादानंतर, संघपालने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हे टोकाचे पाऊल उचलले, पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे

पुढारी वृत्तसेवा

अकोला: "दादा, हा व्हिडिओ पोलिसांना दाखव..." हे एका तरुणाचे शेवटचे शब्द. या शब्दानंतर त्याने रेल्वेखाली उडी घेत आपले आयुष्य संपवले. अकोला जिल्ह्यात एका आंतरजातीय विवाहाचा शेवट इतका दुःखद होईल, याची कुणी कल्पनाही केली नसेल. मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मारहाण आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करत संघपाल खंडारे या तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अकोला जिल्ह्यातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर येथे राहणाऱ्या संघपाल खंडारे यांनी सात वर्षांपूर्वी शबनम फातिमा हिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना एक सहा वर्षांची मुलगीही आहे. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी, गेल्या काही काळापासून त्यांच्यात कौटुंबिक कलह सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, संघपालला आपले जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले.

'माझ्या मृत्यूला...' रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मोठ्या भावाला पाठवला

सोमवारी रात्री पती-पत्नीत झालेल्या वादानंतर, संघपालने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ त्याने आपल्या मोठ्या भावाला पाठवला. यात त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की, "माझ्या मृत्यूला माझी पत्नी शबनम फातिमा, तिची आई, भाऊ आणि इतर नातेवाईक जबाबदार आहेत. या लोकांनी मला पायल इलेक्ट्रॉनिक्सजवळ बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळतील." या व्हिडिओमध्ये संघपालने काही दिवसांपूर्वी पत्नीच्या आग्रहावरून तीन लाखांचे कर्ज काढल्याचेही सांगितले आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला आणि जीविताच्या धोक्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास

संघपालने भावाला व्हिडिओ पाठवल्यानंतर काही वेळातच, बाळापूर तालुक्यातील पारस गावाजवळ अकोला-अमरावती रेल्वेमार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या मारहाणीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. एका प्रेमविवाहाची शोकांतिका आणि आत्महत्येपूर्वीचा भावनिक व्हिडिओ यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. संघपालने व्हिडिओद्वारे न्यायाची मागणी केली असून, पोलीस तपासात काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT