Akola Traffic File Photo
अकोला

Akola Traffic: अकोल्यात कावड यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कधी आणि कोणत्या मार्गावरील वाहतूक वळवली

श्रावण सोमवारनिमित्त जिल्हा प्रशासनाचा निर्णय; प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळवली

पुढारी वृत्तसेवा

अकोला: पवित्र श्रावण महिन्यातील कावड यात्रेनिमित्त वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला शहर आणि जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल जाहीर केले आहेत. जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, भाविकांची गर्दी आणि मिरवणुका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

कावड यात्रा आणि मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, तसेच वाहतुकीची कोंडी टाळून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हे बदल आणि पर्यायी मार्ग काळजीपूर्वक जाणून घ्यावेत, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

कधी आणि केव्हा लागू होणार बदल?

वाहतुकीतील हे बदल श्रावण महिन्यातील चारही सोमवारी विशिष्ट वेळेत लागू राहतील.

पहिले तीन श्रावण सोमवार (२८ जुलै, ४ ऑगस्ट, ११ ऑगस्ट):

राज्य महामार्ग: आदल्या दिवशी (रविवार) दुपारी २ वाजेपासून ते सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत.

अकोला शहर: आदल्या दिवशी (रविवार) रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत.

चौथा श्रावण सोमवार (१८ ऑगस्ट):

राज्य महामार्ग: रविवार, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून ते सोमवार, १८ ऑगस्ट रात्री ८ वाजेपर्यंत.

अकोला शहर: रविवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार, १८ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत.

प्रमुख पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे

१. अकोला-अकोट आणि अकोला-दर्यापूर राज्य महामार्ग

अकोला ते अकोट (येणारी-जाणारी वाहतूक): ही वाहतूक अशोक वाटिका, वाशिम बायपास, शेगाव टी-पॉईंट, गायगाव, निंबा फाटा मार्गे वळवण्यात येईल.

अकोला ते दर्यापूर (येणारी-जाणारी वाहतूक): ही वाहतूक अग्रसेन चौक, दुर्गा चौक, जठारपेठ, मोठी उमरी, गुडधी रेल्वे फाटक, आदिलाबाद मार्गे म्हैसांगकडे वळवण्यात येईल.

२. अकोला शहरातील मिरवणूक मार्गांवरील बदल

रेल्वे स्थानक ते वाशिम बायपास: रेल्वे स्थानक चौकातून वाहतूक अग्रसेन चौक आणि नव्या उड्डाणपुलावरून जेल चौक मार्गे वाशिम बायपासकडे जाईल.

बसस्थानक ते डाबकी रोड/हरिहरपेठ: बसस्थानकाकडून येणारी वाहतूक अशोक वाटिका, जेल चौक, लक्झरी बसस्थानक, वाशिम बायपास मार्गे हरिहरपेठ, किल्ला चौक आणि भांडपुरा चौकातून डाबकी रस्त्याकडे वळवली जाईल.

डाबकी रोड ते बसस्थानक: डाबकी रोडवरून येणारी वाहतूक पोळा चौक, हरिहरपेठ, वाशिम बायपास, लक्झरी बसस्थानक, अशोक वाटिका मार्गे बसस्थानकाकडे जाईल.

लक्झरी बसस्थानक ते रेल्वे स्थानक: ही वाहतूक जेल चौक आणि नव्या उड्डाणपुलावरून अग्रसेन चौक मार्गे रेल्वे स्थानकाकडे वळवण्यात येईल.

३. मूर्तिजापूर-दर्यापूर मार्गावरील बदल

मूर्तिजापूर ते दर्यापूर: टोलनाक्यावरून येणारी वाहतूक हिरपूर, बोरटा, आसरा फाटा मार्गे अमरावती रस्त्याने दर्यापूरकडे वळवण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT