अकोला : केंद्र व राज्य शासनाने विविध योजना- उपक्रमांद्वारे समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताकदिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे उत्साहात झाला, प्रारंभी पालकमंत्री फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण, तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत व पथसंचलन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नागरिकांना संबोधित केले. आमदार रणधीर सावकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महापालिका आयुक्त सुनील लहाने, माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री फुंडकर म्हणाले की, साडेसात दशकांच्या प्रवासात देशाने जगभरात प्रगतीचे किर्तीमान मानदंड निर्माण केले आहेत. पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, रोजगार, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत देश देदिप्यमान कामगिरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची महासत्ता होण्याकडे वाटचाल होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांतील प्राधान्याच्या कामांसाठी सातकलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याचा प्रयत्न होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून अत्याधुनिक जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑलिम्पिक जलतरण तलाव, महिला रुग्णालय अकोला येथील इफ्ल्युएंट ट्रिटमेंट प्लांट हा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे. नगरविकास विभागामार्फत 1200 प्रेक्षक क्षमतेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीपथावर आहे. अकोल्याची सांस्कृतिक समृद्धी वाढविणारे हे भवन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समारंभात राष्ट्रध्वज वंदन झाल्यानंतर जिल्हा पोलीस दल, बिनतारी संदेश यंत्रणा, दंगल नियंत्रण पथक, सक्षम, प्रादेशिक परिवहन पथक आदी विविध पथकांनी दिखामदार पथसंचलन केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट व देशभक्तीपर घोषणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, वीरमाता, वीरपत्नी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर रचना व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन पथक, स्वयंसेवी संस्था आदींना त्यांच्या कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.