अकोला : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोट,बाळापूर,अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व) व मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता १०१६ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 1-सीआरपीएफ प्लाटून व 1 एसआरपीएफ प्लाटून नियुक्त करण्यात आलेले आहे.
प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी त्रीस्तरीय बंदोबस्त लावण्यात आलेला असून मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी येणा-या प्रत्येक व्यक्तीला तपासणी करुनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामध्ये पहिला स्तर हा स्थानिक पोलीसांचा असून हा मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर अंतरावर राहील. दुसरा स्तर हा मतमोजणी कक्षाच्या बाहेर प्रवेशव्दाराजवळ त्याठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी कार्यरत राहतील. तसेच तीसरा स्तर हा मतमोजणी कक्षाच्या प्रवेशव्दारावर राहणार असून त्या ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत.
या दुस-या व तीस-या स्तराच्या ठिकाणी तपासणी करीता पोलीस विभागाकडून बसविण्यात आलेल्या मेटल डिटेक्टर तपासणी यंत्राव्दारे तपासणी करण्यात येईल.
भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल व तत्सम उपकरणे वापरावर प्रतिबंध असून मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल व तत्सम उपकरणांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास परवानगी दिलेले अधिकारी,कर्मचारी वगळता अन्य अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार, प्रतिनिधी यांनी मतमोजणीच्या ठिकाणी येताना मोबाईल सोबत आणू नये असे सूचित करण्यात आले आहे.
मतदार संघनिहाय सर्व मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच घडल्यास तात्काळ उपाय योजना व्हाव्या याकरीता अग्नीशमन दल तसेच वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.