अकोला

Akola Drought News : अकोला जिल्ह्यात ‘ट्रिगर १’ लागू; चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दुष्काळी संकटात बळीराजाला दिलासा, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तत्परता

पुढारी वृत्तसेवा

अकोला : दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांत ‘ट्रिगर १’ (प्रथम कळ) नुसार विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, यात अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तपशीलवार नोंद घेऊन येत्या चार दिवसांत पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राबवावयाच्या उपाययोजना, शासन निर्देश व सवलतींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली; त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव प्रत्यक्ष उपस्थित होते; तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हीसी) सहभागी झाले होते.

पंचनामे करताना कोणतीही हयगय न करता प्रत्येक नुकसानाची काळजीपूर्वक व सविस्तर नोंद घ्यावी. सातही तालुक्यांतील शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानाचे क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीसह अ, ब, क, ड नमुन्यांत अहवाल सादर करावा. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिस पाटील, सरपंच आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

शेतकऱ्यांचे नाव, बँक खात्याचे तपशील आणि मोबाइल क्रमांक बिनचूक नोंदवले गेल्याची खातरजमा करावी. सर्व तहसीलदारांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा, तसेच कृषी अधीक्षकांनी संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल विहित मुदतीत सादर करावा. दररोज पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची नोंद गुगल शीटवर अद्ययावत करावी. या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे; कामात कोणताही विलंब अथवा हलगर्जीपणा चालणार नाही. सर्वांनी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, अशी तंबीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दुष्काळग्रस्त भागासाठी लागू असलेल्या सवलती :

जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी जाहीर केलेल्या सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

  • जमीन महसुलात सूट

  • पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

  • कृषी पंपांच्या चालू वीजदेयकांत सवलत

  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

  • रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे

  • आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय करणे

  • टंचाई जाहीर झालेल्या गावांत कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे

  • शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेणे

  • जनावरांसाठी पुरेसा चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करणे

  • जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेणे

या सर्व उपाययोजनांची संबंधित विभागांनी तातडीने पूर्तता करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT