अकोला : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मूर्तीजापूर तालुक्यातील वाई (माना) गावात उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर टोकाच्या कृत्यात होऊन, वहिनी आणि पुतण्याने मिळून चक्क स्वतःच्या काकाची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी सकाळी ९:४० च्या सुमारास फिर्यादी गोपाळ रामकृष्ण भटकर यांना त्यांचा पुतण्या स्वप्नील याने फोन करून 'संजय काका मरण पावले' अशी माहिती दिली. गोपाळ भटकर यांनी तातडीने वाई गावात धाव घेतली असता, त्यांचे भाऊ संजय रामकृष्ण भटकर (५०) हे घरामागील गोठ्यात मृतावस्थेत आढळले.
सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद केली होती. मात्र, मृतदेहाचे विच्छेदन मूर्तीजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात करण्यात आले असता, धक्कादायक बाब समोर आली. संजय भटकर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून 'गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून' झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा (BNS कलम १०३-१) गुन्हा दाखल केला.
पोलीस तपासात आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा खून घरगुती वादातून झाल्याचा संशय बळावला. पोलिसांनी संशयावरून मृतकाची वहिनी संगीता विनोद भटकर (४८) आणि पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (२५) यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. किरकोळ वादातून दोघांनी मिळून संजय यांना मारहाण केली आणि त्यानंतर गळा आवळून त्यांचा जीव घेतला.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकर, पोउपनि महाजन आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.