अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वहाळा बुद्रुक येथे रविवारी (दि.१७) रात्री एक घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे १ ते दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये घरकुल योजनेच्या हप्त्यापोटी बँकेतून काढलेल्या ७० हजार रुपयांच्या रोख रकमेचाही समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वहाळा बु. येथील रहिवासी मंगेश जगदेव सौंदळे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून आपल्या घराच्या स्लॅबवर (गच्चीवर) झोपण्यासाठी गेले होते. याचाच गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास केली.
मंगेश सौंदळे यांना काही दिवसांपूर्वीच शासनाच्या 'घरकुल' योजनेचा हप्ता मिळाला होता. घराच्या बांधकामासाठी त्यांनी नुकतेच बँकेतून सुमारे ७० हजार रुपये काढले होते. ही रक्कम आणि घरातील इतर काही रोकड त्यांनी कपाटात ठेवली होती, ज्यावर चोरट्यांनी डल्ला मारला.
चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही घरफोडी केल्याचे समोर आले आहे. चोरी करताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी प्रथम सौंदळे यांच्या घराबाहेरील लाईट बंद केला. इतकेच नव्हे तर, घरातून पळ काढताना आजूबाजूच्या लोकांनी पाठलाग करू नये म्हणून त्यांनी शेजारच्या घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या होत्या.
सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी सौंदळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.