Akola Administration
अकोला : शासनाने महाराष्ट्रदिनी क्रमवारी जाहीर केली. त्यात राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिका-यांमध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेत जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यां मध्ये स्थान मिळाले आहे.
एआय, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुलभ अर्ज व तक्रार निवारण प्रणाली, अभ्यागतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा, गुंतवणुकीला प्रोत्साहन, महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीचा १०० टक्के वापर, अकोला महाखनिज पोर्टलसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अकोला जिल्हा प्रशासनाला हा गौरव प्राप्त झाला आहे.
शासनाने महाराष्ट्रदिनी ही क्रमवारी जाहीर केली. त्यात राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिका-यांमध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या हस्ते दि.७ मे रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरण समारोह आयोजित केला आहे. राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनीही जिल्हाधिकारी कुंभार यांचे अभिनंदन केले.
भारतीय गुणवत्ता परिषद, दिल्ली या त्रयस्थ संस्थेकडून मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. त्यासाठी संकेतस्थळ कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर, सुकर जीवनमान ,कार्यालयीन व्यवस्थापन आदी १० निकष होते.