नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बेरोजगार युवकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला आहे. या घटनेतील सहा आरोपींना या ५४ लाख रुपयांच्या फसवणुकी संदर्भात अटक करण्यात आली आहे.
राजस्थान, हैदराबाद, मुंबई, गुजरात येथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून ९ मोबाईल, २० क्रेडिट कार्ड, ८ लाख रुपयांची रोकड आणि ३७ लाख रुपये बँक खात्यांमध्ये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोर्टाच्या आदेशाने ही रक्कम पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती गुन्हे शाखा सायबर पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली. अटकेतील आरोपींची नावे आकाश तिवारी, रवि वर्मा, संतोष मिश्रा (रा. मुंबई), मित व्यास (रा. गुजरात),अंकित ताटे, अरविंद शर्मा (विजयनगर, राजस्थान) अशी आहेत.
टेलिग्राम, व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही महाठग अनेक बेरोजगार युवकांना वेगवेगळे टास्क देत होती. या टोळीने सुरुवातीला पन्नास हजार ते दोन लाख रुपये पर्यंत दरमहा उत्पन्न त्यांना मिळण्याचे अमिष बेरोजगारांना दाखविले. हळूहळू या टोळीने त्यांना अधिक पैशाचे आमिष देत बेरोजगार उमेदवारांना गैरफायदा घेतला. पैशाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या या टोळीकडे अनेक तरुणानी पैसे गुंतवले. मात्र पुढे त्यांना पैसे परत देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. अखेरीस घनश्याम नरेश गोविंदानी (रा. बैरामजी टाऊन) या केमिकल इंजिनिअर युवकाने या प्रकरणाबाबत गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली.
सायबर विभागात २६ एप्रिल २०२३ रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आपली सूत्रे फिरवली. विविध राज्यात पसरलेल्या टोळीची पाळेमुळे खोदून काढत या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. नागपुरात आणण्यात आले. विशेष म्हणजे ही मंडळी गरजू लोकांच्या अकाउंटचा गैरफायदा घेत होती. त्यांना आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले गेले हे कळत होते. मात्र त्यांना काही पैसे देऊन त्यांनी यात गुंतवले अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. दरम्यान,सायबर क्राईमची आपल्या खात्यांवर नजर असल्याची त्यांना कुठलीही माहिती नसल्याचे तपासात पुढे आले. विशेष म्हणजे मित व्यास या आरोपीने हा पैसा क्रिप्टो करंसीच्या माध्यमातून चीनपर्यंत गुंतविला. एकंदरीत या फसवणूक क्षेत्रात मोठी टोळी काम करत असल्याची माहिती आहे.
यातील काही आयटी क्षेत्रातील तज्ञ, काही बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचेही लागेबांधे असून पैसा गुंतवणूक करणारे, पैसा पुरविणारे अशी मोठी लिंक या संदर्भात असल्याची माहिती असल्याने या सर्वांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चांडक यांनी दिली. पोलीस निरीक्षक डोळस, बघेल,शेळके आदींच्या चमूने ही यशस्वी कामगिरी केली.