विदर्भ

सिंदेवाही तालुक्यातील ११ गावांचा संपर्क तुटला! कळमगाव उमा नदीवरील रपटा वाहून गेल्याने मार्ग बंद

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे सिंदेवाही तालुक्यातील उमानदीच्या पात्रात वाढ झाली आहे. कळमगाव उमा नदीवरील रपटा वाहून गेल्याने परिसरातील ११ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

संततधार पावसामुळे नदी, नाले, पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदात आहे. सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. कळमगाव उमा नदीवरील रपटा वाहून गेल्याने परिसरातील ११ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला.

सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना येथील उमा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने नेहमीच हा मार्ग बंद होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नवीन पुलाची मागणी केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय बजेटमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नवीन पूल मंजूर झाल्याने जुना पूल तोडून त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरु असल्याने परिसरातील नागरिकांना सिंदेवाहीला जाण्या-येण्याकरिता नदीवर तात्पुरता रपटा तयार करण्यात आला. सध्या या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यातच नदीच्या पात्रात अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली. निर्माण करण्यात येणारा रपटा देखील वाहून गेला. त्यामुळे कळमगाव गन्ना, मोहबोडी, बाम्हणी, इटोली, चारगाव, कुकडहेटी, विसापूर, नलेश्वर, मोहाळ जामसाळा, पांगडी या अकरा गावांचा सिंदेवाहीसोबत संपर्क तुटला आहे.

SCROLL FOR NEXT