Manoj Jarange Patil Audio Clip Pudhari
महाराष्ट्र

Jarange Audio Clip: जरांगेंच्या आरोपांनी राजकारण तापलं! ऑडिओ क्लिप बाहेर आली अन् उदय सामंत थेट मैदानात; फडणवीसांकडे केली मोठी मागणी

Manoj Jarange Patil Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपचा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Rahul Shelke

Manoj Jarange Patil Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच मराठा आंदोलनाविरोधात रणनीती आखली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज खरे आहेत की बनावट, याची फॉरेन्सिक तपासणी करावी आणि प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करावी, अशी मागणी सामंत यांनी केली आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, जरांगे यांच्यासोबत आमचे काही मुद्द्यांवर तात्त्विक मतभेद आहेत. मात्र, त्यांच्या आंदोलनातील प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा पुढाकार घेतला होता. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित काही व्यक्तींची नावे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत आहे का, याचाही तपास झाला पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून कोण काम करतंय का?

या प्रकरणावर बोलताना उदय सामंत यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून कोणी हे सर्व करत आहे का, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये आंदोलन कसे थांबवायचे, सोशल मीडियावर कोणते मुद्दे पुढे आणायचे आणि मराठा नेत्यांना कशा प्रकारे मदत करायची, याबाबत चर्चा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या क्लिपमधील दावे खरे आहेत की नाहीत, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. केवळ आरोपांच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्याबद्दल सामंतांचा आक्षेप

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्याबद्दलही उदय सामंत यांनी आक्षेप नोंदवला. कोणतेही ठोस कारण नसताना श्रीकांत शिंदे यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याचे ते म्हणाले.

यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. क्लिपमधील आरोप खरे ठरले, तर संबंधितांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ऑडिओ क्लिपची SIT चौकशी करण्याची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी उदय सामंत यांनी केली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत, क्लिप खरी आहे की बनावट, ती कोणी तयार केली आणि ती सार्वजनिक करण्यामागे नेमका काय उद्देश होता, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे ते म्हणाले.

या प्रकरणाची केवळ प्राथमिक चौकशी न करता विशेष तपास पथकामार्फत (SIT) तपास केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कथित क्लिपमध्ये भाजपच्या मीडिया टीमशी संबंधित व्यक्तींची नावे असल्याची चर्चा सुरू असल्याने या दाव्यांचीही सत्यता तपासली पाहिजे, असे सामंत यांनी म्हटले.

मराठा आंदोलनावरून राजकीय संघर्ष वाढणार?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन केले, हे कोणीही नाकारू शकत नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मात्र, आता या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले आहे. क्लिपमधील दावे, त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तींची भूमिका आणि त्यामागील नेमका उद्देश याबाबत अद्याप चौकशीतून सत्य समोर येणे बाकी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाच्या चौकशीबाबत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT