पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या बळीराजाला आणि संपूर्ण राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. 17 ऑगस्टपर्यंत कोरडी गेलेली परिस्थिती 18 ते 20 ऑगस्ट या केवळ तीन दिवसांत पूर्णपणे बदलली. या काळात राज्यात तब्बल अडीच महिन्यांच्या सरासरीइतका, म्हणजेच 320 मि.मी. पाऊस अक्षरशः कोसळला. यामुळे राज्यातील दुष्काळाचे संकट तूर्तास टळले आहे.
जून आणि जुलै महिन्यातील कमी पावसानंतर ऑगस्टच्या सुरुवातीलाही पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या होत्या आणि शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, 15 ऑगस्टनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि 18 ते 20 ऑगस्ट या काळात त्याने संपूर्ण राज्याला झोडपून काढले. या तीन दिवसांच्या पावसाने राज्यातील पावसाची तूट भरून काढत सरासरी ओलांडली आहे. विशेषतः मराठवाड्यासाठी हा पाऊस संजीवनी ठरला असला तरी, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत त्याने रौद्ररूप धारण केले आहे. विभागातील आठही जिल्ह्यांत 320 ते 350 मि.मी. पावसाने हजेरी लावल्याने तीन महिन्यांची सरासरी अवघ्या तीन दिवसांत भरून निघाली आणि अनेक नद्यांना पूर आला.
1 जून ते 28 ऑगस्ट : राज्याची एकूण स्थिती
संपूर्ण महाराष्ट्र : 6 टक्के अधिक (सरासरी : 788.6 मि.मी., पडलेला : 838.8 मि.मी.)
मध्य महाराष्ट्र : 7 टक्के अधिक (सरासरी : 571.6 मि.मी., पडलेला : 614 मि.मी.)
मराठवाडा : 1 टक्के अधिक (13 ऑगस्टपर्यंत 40 टक्के तूट होती)
विदर्भ : 3 टक्के अधिक (सरासरी : 753.3 मि.मी., पडलेला : 778.8 मि.मी.)