डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ मार्गावरील निळजे गावच्या तलावाकाठी बांधण्यात येत असलेल्या व्हर्साटाईल डेव्हलपर्सच्या विकासकाने गेल्या आठ वर्षांच्या काळात इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता, तसेच दिलेल्या मुदतीत सदनिकेचा ताबा ग्राहकाला दिला नाही म्हणून या गृहप्रकल्पातील घरासाठी नोंदणी केलेल्या एका नोकरदार गृहस्थाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार विकासकासह त्याच्या भागीदारांविरुद्ध मानपाडा पोलिसांनी 33 लाख 57 हजार 848 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
सदनिकेचा ताबा देण्याची वेळ निघून गेली तरी नवीन गृहसंकुल उभे राहत नाही. विकासक बांधकाम परवानग्या मिळाल्या की कामे सुरू होणार अशी साचेबध्द उत्तरे त्या ठिकाणी घराची नोंदणी करणार्या इतर रहिवाश्यांना देत होते. आठ वर्षे उलटूनही घराचा ताबा विकासकाकडून मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर अरविंद आठनेरे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात विकासक आणि त्याच्या भागीदार व कर्मचार्यांविरुध्द तक्रार केली. त्यानुसार व्हर्साटाईल डेव्हलपर्सचे मालक आनंद मुलराजभाई ठक्कर (46, रा. पारूल न्यू माणिकलाल मेहता इस्टेट, घाटकोपर, मुंबई), जागृती आनंद ठक्कर (40), तेजस भाटे (35, रा. निळजे गाव), आमिष शहा (40, रा. निळजे गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
निळजे गावातील धक्कादायक प्रकार
अरविंद आठनेरे यांनी निळजे गावाच्या बाहेर असलेल्या तलावाच्या काठी व्हर्साटाईल डेव्हलपर्सकडून उभारण्यात येणार्या गृहसंकुलात 33 लाख 57 हजार 848 रुपये किमतीला एक सदनिकेची नोंदणी मे 2014 मध्ये केली होती. अरविंद यांनी टप्प्याने हे पैसे विकासकाला दिले होते. ठरावीक मुदतीत अरविंद यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. असेच आश्वासन इतर ग्राहकांना देण्यात आले.