ठाणे : प्रवीण सोनावणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदे समर्थक गट विरोधात शिवसेना असा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र रंगला आहे. असे असताना आता शिवसेना शाखांवर वर्चस्व कुणाचे असा नवा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. याची पहिली ठिणगी ठाणे शहरातील कळवा परिसरात पडली आहे.
ज्या शिवसेना शाखेचे उद्घाटन स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते अशा कळवा नाक्यावरील शिवसेना शाखेवर शिंदे समर्थकांचा बॅनर लावण्यावरून शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हमारी तुमरीपर्यंत आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र यांची चर्चा कुठे झाली नसली तरी भविष्यात हा वर्चस्वावरील संघर्ष अधिक उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी शहरात शहरात तसेच ग्रामीण भागात शिवसेनेने आपल्या शाखा निर्माण केल्या. या शाखांचे प्रमुख म्हणून शाखा प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. याच शिवसेना शाखांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याबरोबर पक्षाच्या आंदोलनाची रणनीती याच शिवसेना शाखांमधून केली जाते.
मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेमकी कोणाची? असा मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे समर्थक विरोधात शिवसैनिक असा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात पेटला आहे. हा संघर्ष आता एवढ्यापुरता राहणार नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाण्यातील शिवसेना शाखांवर देखील राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत.
ठाणे शहर आणि जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिला आहे. खाडीच्या पलीकडे कळव्यातही शिवसेनेचे बर्यापैकी प्राबल्य आहे. चार दिवसांपूर्वीच कळव्यातील शिवसेना शाखेवर याची प्रचिती आली आहे. कळवा नाक्यावर असलेल्या शिवसेना शाखेचे उदघाटन खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. याच शाखेवर ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर गणेश साळवी यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शाखेवर बॅनर लावण्याचा प्रयन्त केला.
मात्र कळव्यातील विभागप्रमुख विजय शिंदे यांनी याला विरोध केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच राहावे अशी इच्छा कळव्यातील शिवसैनिकांची आहे. तसेच अजूनही या राजकीय परिस्थितीवर अद्याप निर्णय झाला नसल्याने बॅनर लावण्यास विरोध केला असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाल्याचे वृत्त असून याबाबत मात्र कुठेच चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा वाद फारसा समोर आला नसला तरी, भविष्यात हा संघर्ष अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
कळव्यातील शिवसेना नगरसेवकांचे वेट अँड वॉच…
एकनाथ शिंदे यांना माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 67 नगरसेवकांनी आपला पाठिंबा दर्शवला असल्याचा दावा पक्षांकडून करण्यात आला आहे. ठाण्यातील काही नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन देणारे बॅनर देखील ठिकठिकाणी लावले आहेत. खाडीच्या पलिकडे कळव्यात मात्र अद्याप असे चित्र पाहायला मिळालेले नाही.
माजी उपमहापौर गणेश साळवी आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी वगळता शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाने अद्याप एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे जाहीर केलेले नाही किंवा अशा आशयाचे बॅनर देखील लावलेले नाहीत. ठाण्यातील सर्वच नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात असले तरी, कळव्यातील शिवसैनिकांचे मात्र सध्या तरी वेट अँड वॉचच्या भुमीकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी शवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी रस्त्यावर उरले आणि शिंदे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले. त्याची किंमत ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांना मोजावी लागली. त्यांना शिवसेनेने पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून पक्षातून काढून टाकण्यात आले. तर मला कुठलीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली असून शिंदे यांच्यासोबत राहण्यासाठी कुठलेही पद सोडायला तयार असल्याची प्रक्रिया शिंदे यांनी कारवाईनंतर दिली.
म्हस्के यांच्यासोबत शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये असलेल्या ठाणे जिल्हा संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे ह्या आघाडीवर होत्या. महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी शिवसेना मजबूत केले आहे. तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणार्या मीनाक्षी शिंदे यांची आज पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची घोषणा शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली. महिला संघटक म्हणून शिंदे यांनी ठाण्यातील सर्व महिलांना आनंद आश्रम येथे एकत्र येऊन नामदार एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आहे.