ठाणे

भूमिगत विद्युत वाहिन्यांचा लोकांच्या जीवाशी खेळ

अमृता चौगुले

वाडा : पुढारी वृत्तसेवा :  वाडा तालुक्यातील भावेघर विद्युत उपकेंद्र ते घोणसई अशा जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जमिनीखालून नेण्याचे काम सुरू आहे. प्रचंड विद्युत दाबाच्या वाहिन्या जमिनीपासून योग्य अंतरावर पुरण्यात येत नसल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात असून तातडीने पूर्ण काम अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

भावेघर विद्युत उपकेंद्र येथून 36 केव्ही क्षमतेच्या तीन विद्युत वाहिन्या तालुक्यातील घोणसई येथे जात असून त्या एका खासगी कंपनीसाठी जात आहेत. लीना पॉवर टेक नावाच्या कंत्राटदारांनी हे काम घेतले असून ते जोमाने सुरू आहे. अंदाजपत्रकानुसार विद्युत वाहिन्या नेण्याचे काम होत नसल्याने अनेक शेतकरी व स्थानिक मात्र याबाबत चांगलेच संतापले असून लोकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे.

कंत्राटदाराने उच्च दाबाच्या या वाहिन्या अगदी एक, दीड तर काही जागी दोन फुटांवर पुरल्या आहेत, खरेतर त्या सात फुटापर्यंत पुरणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे, अशी मागणी केली जात आहे. पुलाच्या बाजूला वाहिन्या नेत असताना त्या पाईप मध्ये बंदिस्त असायला हव्यात मात्र तसे न करता त्या उघड्यावर ठेवलेल्या आहेत. उच्च दाबाच्या वाहिन्या इतक्या बेजबाबदारपणे कुणी कशा नेऊ शकतो याबाबत सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले असून महावितरण अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप लोकांनी केला आहे.

नागरिकांची सुरक्षा आलीय धोक्यात

कारखाने व महावितरण कंपनी आपल्या हितासाठी लोकांचा जीव का धोक्यात घालीत आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून तातडीने याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी सखोल चौकशी करून केलेले थातूरमातूर काम पुन्हा करून घ्यावे शिवाय पुढे केले जाणारे काम अंदाजपत्रकानुसार करावे, अशी मागणी केली जात आहे. तालुक्यातील विविध भागात अशा विद्युत केबल तर अनेक ठिकाणी इंटरनेटसाठी केबल राजरोस नेल्या जातात. ज्यासाठी मोठे खोदकाम करण्यात येत असून यात रस्ते व लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत कामगारांना सूचना केल्या असून काही ठिकाणी खोल जाता येत नसल्याने तसे झाले असावे, याबाबत नक्कीच सुधारणा केली जाईल
-अभिषेक करणकर, अभियंता , लीना पॉवर टेक बेलापूर

एक मीटर खोली त्यासाठी आवश्यक असून कंत्राटदाराला याबाबत सूचना केल्या आहेत, प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत अधिक कार्यवाही केली जाईल.
-ज्ञानेश्वर वट्टमवर, उप अभियंता, महावितरण, वाडा

SCROLL FOR NEXT