ठाणे

भातसा धरणात मुबलक पाणीसाठा; पाणीकपात टळणार

अमृता चौगुले

शहापूर : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपातीच्या बातम्या सुरू असल्याने भातसा धरण विभागाशी संपर्क साधला असता अजूनही पुरेसा पाणीसाठा भातसा धरणात शिल्लक असून पुढील 90 दिवस मुंबईला व ठाण्याला पुरेल इतका पाणी साठा शिल्लक असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही अशी खात्रीलायक माहिती भातसा धरण विभागाने दिली .

चालुवर्षी जून महिना संपायला आला तरीही अजून पावसाची सुरुवात न झाल्याने शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मोडकसागर, वैतरणा धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे सावट मुंबईसह, ठाणे शहरासमोर उभे राहिले आहे. सोमवारपासून मुंबईतील पाणी पुरवठामध्ये 10 टक्के पाणी कपातीच्या संदर्भात बातम्या दाखवण्यात आल्या.

या संदर्भात मुंबईला दररोज 2120 दशलक्षली पाणी पुरवठा करणार्‍या भातसा धरणात आजमितीस किती पाणी आहे त्याबाबत माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाच्या भातसा धरण पाणी विभागाचे उपअभियंता विनोद कंक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भातसा धरणात सध्या 90 दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे सांगत आजही भातसा धरणात 285.133/942.10 दश लक्ष लीटर म्हणजेच 30.26 टक्के पाणी साठा शिल्लक असून आजच्याच दिवशी मागीलवर्षी 312.942/942.10 दशलक्ष लीटर म्हणजेच 33.22 टक्के पाणी साठा शिल्लक होता अशी माहिती दिली.

मागील वर्षी भातसा धरणाची पाणी पातळी 111.34 मिटर होती तर यावर्षी 109.50 मिटर आहे. तसेच उपभियंता विनोद कंक यांनी आजही नेहमीप्रमाणेच मुंबई महानगर पालिकेसाठी दररोज 2120 दशलक्ष लीटर तर ठाणे महानगरपालिकेसाठी 220 दशलक्ष ली पाणी पुरवठा सुरू असून त्यात कोणत्याही प्रकारची पाणी कपातीच्या सूचना आल्या नसल्याचे सांगितले .

यंदाच्या वर्षी पाऊस जरी

लांबला असला तरी देखील धरणातला शिल्लक पाणीसाठा मुंबई व ठाणे शहराला पुरेसा आहे. आगामी 30 दिवस पाणीपुरवठा नियमित पद्धतीने जरी सुरू ठेवला तरी रिझर्व्ह असलेले पाणी आपण 90 दिवस मुंबईला देऊ शकतो.
– योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा धरण विभाग

SCROLL FOR NEXT