ठाणे : पुढारी वृत्तसेवा
गेली महिनाभर हुलकावणी देणारा वरूणराजा गुरूवारी ठाणे जिल्ह्यावर प्रसन्न झाला. शहर आणि जिल्ह्यात दिवसभर वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजा आणि ठाणेकर सुखावले. कोकणातील सर्व जिल्ह्यात हवामान खात्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, तो अंदाज गुरुवारी खरा ठरला. रात्री साडेआठपर्यंत 60 मिली लिटर पावसाची नोंद झाली.
गेल्या 3-4 वर्षात जून पासूनच मनसोक्त बरसणार्या वरुणराजाने यंदा जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या बारवी आणि भातसा धरणात केवळ 31 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांनी पाणीकपात सुरू केली होती. त्याचबरोबरच बळीराजाही चिंतेत होता. मात्र गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास त्याने काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र पावसाची संततधार सुरू होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 20 ते 25 टक्केच पाऊस झाला होता. गुरुवारच्या पावसाने ठाणेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील कामगार रुग्णालयाच्या आवारातील चिंचेचे मोठे झाड पडले. या झाडाची एक फांदी प्रकाश चव्हाण यांच्या घरावर पडल्याने त्यांच्या घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. सकाळी 8.30 वाजेपर्यंत 4 झाडे पडल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे आल्या. आंबे घोसाळे तलावाजवळील जँगिंग ट्रॅकवर झाडाची फांदी पडली होती. मानपाडा येथील उद्यानासमोरील बंगला क्रमांक 8 जवळील रस्त्यावर झाड पडले. राबोडी येथील आकाश गंगा सोसायटी जवळ झाडाची फांदी पडली. मुंब्य्रातील वाय जंक्शंन जवळ रूहिना शेख यांच्या मालकीच्या चारचाकीवर (एम.एच 02 -बीई -8888) झाड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. वागळे इस्टेट मधील रतनभाई कंपाऊड जवळ, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाडाची फांदी पडल्याची घटना घडली. दुपारी 12.30 वाजेपर्यंत शहरात 32.41 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात 21.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरात रात्री 8.30 पर्यंत या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी 30 जून अखेर 702.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा 150.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
विकास कॉम्पलेक्समधील एका बँकेच्या आवारात जुने झाड पडल्याची घटना घडली. दुपारी 3.30 च्या सुमारास राबोडी येथील कत्तलखान्याजवळील हमीदा या 4 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग पडला, त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या इमारतीत 22 खोल्या आणि 4 गाळे आहेत. या इमारतीची सद्य स्थिती पाहता त्यातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याची तयारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली होती, परंतु सदर रहिवाशांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केल्याची माहिती पालिकेने दिली.